नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई करत, साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला आहे. ईडीने एकूण ६५ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष म्हणजे, हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा आहे. त्यामुळे ईडी आता पवारांच्या मागे लागल्याचं बोललं जात आहे. एका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारखान्यावर ही कारवाई केली.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने २०१९मध्येच याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानुसार ईडी तपास करत होते. २०१० साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या साखर कारखान्याचा लिलाव केला होता. मात्र, यावेळी याची किंमत मुद्दाम कमी ठरवण्यात आली होती. गुरु कमॉडिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हा कारखाना विकला गेला होता. बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अजित पवारांचाही समावेश होता. त्यामुळे कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचं पालन करण्यात आलं नव्हतं असा आरोप ईडीने केला आहे.
७०० कोटींहून अधिक कर्जाचा घोटाळा..
गुरू कमॉडिटिजने हा कारखाना विकत घेतल्यानंतर, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाडे तत्त्वावर दिला. सध्या स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे कारखान्याचे सर्वाधिक शेअर्स आहेत. हीच कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं तपासात आढळून आलं आहे, असं ईडीने स्पष्ट केलं. २०१० पासून आतापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतरांकडून सुमारे ७०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी जारंडेश्वर साखर कारखान्याचा वापर केला आहे, असं ईडीने म्हटलं.
अजित आणि शरद पवारांवरही गुन्हा दाखल..
माजी महसूलमंत्री शालिनी पाटील या जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. कारखान्याचा लिलाव थकीत कर्जामुळे झाला नसून, याप्रकरणी गैरव्यवहार करुन अजित पवारांनी हा कारखाना बळकावल्याचा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे, गुरू कमॉडिटीज ही कंपनी अस्तित्वातच नसून, अजित पवारांनीच ही खोटी कंपनी तयार करण्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी अण्णा हजारेंनी मुंबई उच्चन्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच, मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर, २०१९मध्ये ईडीने याप्रकरणी अजित पवारांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरही गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण