सातारा: जिल्ह्यातील कोयना धरणाजवळ रविवारी पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी ३ रिश्टर स्केल असलेले भूकंपाचे धक्के जाणवले. हा सौम्य प्रकारचा धक्का असून तो फक्त कोयना धरण परिसरातच जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाच्या उत्तरबाजुला ५ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे.
कोणतीच हानी नाही : पाटण आणि कोयना परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच पाटण तालुक्यातही कोणतीच हानी झालेली नाही. धरणापासून ५ कि.मी. अंतरावर केंद्रबिंदूभूकंपाचा केंद्रबिंदू कोयना नगरपासून २४ किलोमीटर तर कोयना धरणापासून उत्तरेला ५ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीखाली ३० किलोमीटर इतकी होती. भूकंपाचा हा सौम्य धक्का केवळ कोयना परिसरातच जाणवला. भूकंपामुळे घराला तडे अथवा पडझड झाली नसल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
नव्या वर्षाची सुरूवात भूकंपाच्या मालिकेने: माण तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी साडेदहा वाजता त्यानंतर दीड वाजता आणि काही वेळातच भूकंपाचा तिसरा धक्का बसला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. घबराट निर्माण झाली होती. भूकंपाच्या मालिकेमुळे १५ घरांना तडे गेले होते. तसेच घरातील वस्तूंची पडझड झाली होती. दुष्काळी तालुक्यात एकाच दिवसात तीनवेळा भूकंप झाल्यामुळे माणदेशातील नागरीक भयभीत झाले होते.
मागील वर्षातील भूकंपाची मालिका: सातारा जिल्ह्यात २०२२ मध्ये प्रामुख्याने कोयना धरण परिसरात भूकंप झाले. मागील वर्षी ८ जानेवारीला २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा पहिला धक्का बसला होता. त्यानंतर १ फेब्रुवारीला ३.२ रिश्टर स्केलचा २२ जुलै रोजी आणि २८ ऑक्टोबर रोजी २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. सातारा जिल्ह्यात २०२१ वर्षात लहान-मोठ्या भूकंपाची मालिकाच सुरू होती. या धक्क्यांची गणना केली तर एकूण १२८ वेळा भूकंपाचे धक्के येथे जाणवले होते. त्यामध्ये ११९ वेळा ३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले होते. आणि ९ वेळा ४ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. भूकंपाच्या मालिकेमुळे पाटण तालुक्यातील नागरीक भयभीत झाले होते.