सातारा: माण तालुक्यामध्ये रविवारी सकाळी १०.३० वाजता भूकंपाचा पाहिला सौम्य धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी दीड वाजता आणि सायंकाळी साडे चार वाजता दोन धक्के जाणवले. यातील तिसरा धक्का ३.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. या धक्क्यामुळे नागरिक घरातून बाहेर पळत आले.
माण तालुक्यात पहिल्यांदाच भूकंप: दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या माण तालुक्यात पहिल्यांदाच भूकंपाची मालिका पाहायला मिळाली. एकाच दिवसात ३ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. वास्तविक माण तालुक्यात दुष्काळ पडतो. वळीव पाऊस देखील झोडपतो. त्यावेळी नद्यांना पूर येतो. परंतु, भूकंपाचे धक्के माणदेशाला पहिल्यांदाच बसले.
१५ घरांना तडे: माण तालुक्यातील ढाकणी, धामणी आणि पळशी या परिसरात प्रामुख्याने भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कपाटातील भांडी धडाधड खाली पडली. तसेच १५ ते १६ घरांना भूकंपामुळे तडे गेले. भूकंपाच्या मालिकेमुळे माणदेशातील नागरिक भयभीत झाले आहेत.
माणदेश प्रशासनाकडे यंत्रणाच नाही: माण तालुका प्रशासनाकडे भूकंप मापनाची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाला या भूकंपाच्या मालिकेचे गांभीर्य लक्षात आले नाही. तिन्ही भूकंपाची नोंद कराड आणि कोयना भूकंप मापन केंद्रात झाली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू माणपासून पाच किलोमीटर अंतरावर पळशी, धामणी व ढाकणी परिसरात होता. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चंद्रपूरला भूकंपाचा धोका? चंद्रपूर शहर भूकंपप्रवण क्षेत्रात असून भूकंप झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूर शहरातील भूमिगत कोळसा खाणी ह्या आपत्कालीन स्थितीत एक मोठे आव्हान म्हणून उभ्या ठाकल्या आहेत.
मोठी हानी होण्याची शक्यता: चंद्रपूर शहर हे इंग्रजकालीन भूमिगत कोळसा खाणीने वेढलेला आहे. इंग्रजांच्या काळात सुरू झालेल्या अनेक कोळसा खाणी सुरू आहेत तर काही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या बंद झालेल्या खाणी आहेत त्या अजूनही भरण्यात आलेल्या नाहीत. चंद्रपूर शहर हे भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन 3 च्या वर्गवारीत येतो. अशावेळी भूकंप आल्यास मोठी हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भूकंप सदृश्य कंपन: यंदाच्या पावसाळ्यात घुगुस येथे अचानक एक घर जमिनीखाली गेले आणि तिथे एक भूमिगत कोळसा खाण असल्याचे समोर आले होते. अशावेळी आजूबाजूच्या घरांना खाली करण्यात आले, मात्र, या लोकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. तर याच दरम्यान चंद्रपूर शहराच्या भूभागात काही दिवसांपूर्वी भूकंप सदृश कंपन होत होते. हे कंपन भूगर्भातील होणाऱ्या हालचालीमुळे होत असल्याचे समोर आले आहे.
चंद्रपूर भूकंपप्रवण क्षेत्र: जमिनीखाली भूमिगत कोळसा खाणी आहेत, त्यातील पोकळ झालेल्या बोगद्याचा भाग कोसळल्याने हे कंपन होत आहे. अशावेळी भूकंप आल्यास धोक्याची घंटा असू शकते. मात्र सुदैवाने चंद्रपूर शहर हे भूकंपप्रवण क्षेत्राच्या तीन वर्गात येते. अशा ठिकाणी भूकंप होण्याचा धोका कमी असतो मात्र तो नसतोच असा नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील भूमिगत कोळसा खाणी ह्या हे आपत्कालीन स्थितीत एक मोठे आव्हान म्हणून उभ्या ठाकल्या आहेत.