सातारा - कोयना परिसरात आज सकाळी भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक हादरले आहेत. कोयना परिसरातील देवरुख गावापासून 7 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे कोयणावासीय हादरून गेले आहेत. भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.
कोयना परिसरात वारंवार भूकंपाच्या घटना घडतात. या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कमी सेकंदाचा भूकंप जाणवल्याने तीव्रता मोठी असूनही कुठलेही नुकसान झाले नाही. कोयना, कराड आणि पाटण परिसरात या भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 7.47 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भूकंप होत असल्याचे समजताच घरातून बाहेर येत नागरिक सुरक्षितस्थळी जाण्यासाठी धावपळ करत होते. भूकंपानंतर जिल्ह्यातील कोयना परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.