सातारा: जखमी मुलांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, घटनास्थळावरील व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांची गोची झाली आहे.
पोलीस निरीक्षक मद्यधुंद अवस्थेत: सातारा पोलीस मुख्यालयात बदली होऊन गेलेले पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार हे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास फलटणला आले होते. दत्तनगर भागातून जात असताना त्यांच्या कारने दोन बालकांना उडवले. घटनास्थळी जमलेल्या लोकांना त्यांच्या गाडीत मद्याची बाटली आढळली. तसेच पोलीस निरीक्षक मद्यधुंद अवस्थेत होते.
पोलीस निरीक्षकाला चोपले: घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांची कार थांबवली. तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. तसेच कारमध्ये मद्याच्या बाटल्या होत्या. त्यामुळे संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोपला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. इन्स्पेक्टरला मारहाण केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल: पोलीस निरीक्षक मद्यधुंद अवस्थेत असलेला आणि गाडीत मद्याची बाटली असणारा व्हिडिओ काढून नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे पोलीस निरीक्षकाला वाचविण्याची धडपड करणाऱ्या फलटण पोलिसांची गोची झाली. याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.
बसला कारची धडक: चंद्रपूर जिल्ह्यात काल (रविवारी) एका प्रवासी बसला कारने धडक दिल्याने सहा जण ठार तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे 115 किमी अंतरावर असलेल्या नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानपा गावात सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
चार जणांचा जागीच मृत्यू: सहा जण नागपूरहून नागभीडकडे कारमधून जात असताना त्यांचे वाहन विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसला धडकले. टक्कर इतकी भीषण होती की, कारमधील चार जण जागीच मरण पावले. त्यांचे मृतदेह कापून बाहेर काढावे लागले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अपघातात एक मुलगी व महिला गंभीर जखमी झाली. त्यांना नागभीड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मुलीला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा: