सातारा - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्हाबंदी केली असून सोलापूर जिल्हा हद्दीतून सातारामध्ये येणारे रस्ते सील केले आहेत. जिल्हाबंदीमुळे नातेपुते व फलटणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने नवीन पालकमंत्री भरणे रात्री सोलापूरकरकडील रस्त्यावर अडकून पडले होते. ते कोल्हापूर दौरा करून शिंगणापूर मार्गे सोलापूरला जात असताना जिल्हाबंदीमुळे नातेपुते घाटामध्ये मंत्री महोदयांची गाडी मातीच्या ढिगाऱ्यात अडकली.
काही वेळातच शिंगणापूर येथील विरभद्रा कावडे व काही नागरिकांनी मदत करून त्यांची अडकलेली गाडी त्या ठिकाणाहून ट्रॅक्टरच्या मदतीने काढली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्हाबंदी करण्याचे आदेश दिल्याने शिंगणापूरहून नातेपुतेकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात सोलापूर प्रशासनाच्या आदेशानुसार माळशिरस तालुक्यातील पिंपरी ग्रामरक्षक समितीने सातारा-सोलापूर सीमेवरील भवानी घाटात रस्ता सील केल्यामुळे नातेपुते-शिंगणापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचाच फटका सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पहिला बसला आहे.