सातारा - कराड भाजी मंडईतील गाळे भाडे करार तत्वावर घेतलेले व्यापारी आणि ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन येणारे शेतकरी यांचा वाद गुरुवारी (दि. २३) उफाळून आला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रस्त्यावर शेतमालाची विक्री करण्यात विरोध करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी कराड नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या दालनाबाहेर ठिय्या मारला. मात्र, मुख्या धिकारी परगावी असल्यामुळे शेतकऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.
हेही वाचा - महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात
गुरुवार आणि रविवार हा कराडच्या बाजाराचा दिवस असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी कराडला घेऊन येतात. या दोन्ही दिवशी कराडच्या प्रमुख रस्त्यांवर भाजी मंडई भरते. जिल्हा व सत्र न्यायालय, पोस्ट ऑफीसपर्यंत भाजी मंडई भरू लागल्यामुळे कराड शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ लागली. यामुळे पोलिसांनी रस्त्यांवर विक्रेत्यांना बसू देऊ नये, अशी सूचना पालिकेला केली. त्यातच मुख्य भाजी मंडईतील गाळे भाडे करारावर घेतलेल्या व्यापार्यांनीही ग्रामीण शेतकर्यांना रस्त्यावर बसू देण्यास विरोध केला. त्यामुळे हा वाद गुरुवारी आठवडी बाजारादिवशी उफाळून आला.
ग्रामीण भागातील शेतकर्यांना रस्त्यांवर भाजीपाला विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे शेतकर्यांनी थेट कराड नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकार्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मारला. मुख्याधिकारी यशवंत डांगे हे बाहेर गावी होते. त्यामुळे शेतकर्यांनी दुपारी नगरपालिका प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या सर्व गदारोळामुळे गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत कराड नगरपालिकेच्या आवाराला मंडईसारखे स्वरूप आले होते.
हेही वाचा - मलकापूर नगरपालिकेने केलेल्या करवाढीविरोधात भाजपचे लाक्षणिक उपोषण