सातारा - सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाला काढण्यात आलेली 'वारी शेतकऱ्यांची' ही पदयात्रा महामार्गावर अडवण्यात आली. यामुळे सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने वाहतूक काही काळ खोळंबली. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही थांबणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी पोलीस प्रशासनाला ठणकावले.
महामार्गावरच ठिय्या आंदोलन - रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा दरम्यान ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रा काढण्यात आली आहे. पदयात्रा चौथ्या दिवशी साताऱ्यात दाखल होत असतानाच शिवराज चौकात पोलिसांनी पदयात्रा अडवली. त्यावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस दमदाटी करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याविरोधात सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पोलीस प्रशासन नरमले - आंदोलनामुळे वाहतूक खोळंबल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भुमिका घेतली. त्यामुळे पदयात्रा पुन्हा मार्गस्थ झाली. पोवई नाका येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर धडक - गावगाढ्याचे प्रश्न घेवून कराडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही पदयात्रा काढली आहे. पदयात्रेचा चौथा दिवस असून सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देईल, अशी आशा असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. मात्र, निर्णय झाला नाही तर आम्ही वाहनाने मुंबईला जाऊन मंत्रालयावर धडक देऊ, असा इशारही खोत यांनी दिला.
'या' आहेत प्रमुख मागण्या...- गुजरातच्या धर्तीवर उसाला दर देण्यात यावा. इथेनॉल निर्मितीसाठी शेतकरी कंपनीला परवानगी मिळावी. दोन साखर कारखान्यामधील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करावी. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल अट
बँकांनी बंद करावी. ऊस तोडणीचे करार महामंडळाच्या
वतीने करण्यात यावेत. मुंबईत सरपंच भवन उभारण्यात
यावे. सरपंचांनाही एसटीत मोफत प्रवास मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेने पदयात्रा काढली आहे.
हेही वाचा -