कराड (सातारा) - मागील वर्षी कराडसह पाटण तालुक्यात झालेली अतिवृष्टी, भूस्खलन आणि महापुराची परिस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल सज्ज झाले आहे. कराडमधील कृष्णा-कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर गृहरक्षक दलाच्या 200 जवानांना दोन दिवस आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. जवानांना बोट चालविण्यासह आपत्कालिन परिस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
होमगार्डना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू - यावेळी सातार्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांच्यासह कराड आणि पाटण तालुक्यातील पोलीस, महसूल विभागाील अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन पूरग्रस्त भागातील लोकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून होमगार्डना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. दरडग्रस्त भागातील लोकांनाही प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरडग्रस्त व पूरग्रस्त भागातील संभाव्य जीवितहानी टाळण्याचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा प्रयत्न असल्याचे देविदास ताम्हाणे यांनी सांगितले.