कराड (सातारा) - वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ढेबेवाडी खोऱ्यातील शेतकरी भर पावसात झाडांवर प्लास्टिक कागदाची मचान बांधून रात्रभर शिवारांना जागता पहारा देत आहेत. डबे वाजवून रानडुकरांसह अन्य जंगली प्राण्यांना पळवून लावत आहेत.
सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या आणि चोहोबाजूनी घनदाट जंगलांनी वेढलेल्या निवी, कसणी, निगडे, घोटीलसह परिसरातील वाड्यावस्त्यांवर वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे. नुकसानीपेक्षा शेती पाडूनच ठेवलेली बरी, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. पिके रानडुकरे आणि गव्यांच्या कळपांकडून फस्त केली जात असल्याने शेतकरी रात्रंदिवस शिवाराला पहारा देतात.
पेरलेले धान्यही रानडुकरे उकरून खात असल्याने खरीप आणि रब्बीची पेरणी केल्यापासून शेतकरी पहारा देतात. त्यासाठी शिवारातील झाडांच्या मजबूत फांद्यांवर मचान उभारली जाते. पाण्याची बाटली, जेवण व बॅटरी घेऊन सायंकाळच्या सुमारास शेतकरी तिकडे रवाना होतात. मचानाला बांधलेले पत्र्याचे डबे वाजवून प्राण्यांना पळवून लावले जाते. धो-धो पावसातही शेताची राखण सुरूच असते.
सध्या भुईमूग, संकरित ज्वारी व कडधान्याची पेरणी झाली आहे. लवकरच भातरोप लावणीलाही सुरुवात होईल. पेरणी केल्यापासून शेतकरी रात्री शिवारातच मुक्कामी थांबत आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी झाडांवर बांबू व प्लास्टिक कागदाचा वापर करून मचानही बांधलेली आहेत. पेरणीनंतर पीक उगवून येईपर्यंत डुकरांचा आणि तेथून पुढे डुक्करे,वानरे आणि गव्यांच्या कळपाचा शिवारात धुमाकूळ वाढतो. त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागता द्यावा लागतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.