सातारा: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, अशा नामांतरावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याची पहिली नोंद घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या जाधव कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्न पत्रिकेवर धाराशिव छापण्याचा पहिला मान जाधव कुटुंबाने मिळवला आहे. ही पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक देखील कौतुकाने या पत्रिकेची दखल घेताना दिसत आहेत.
धाराशिवची लेक होणार फलटणची सून: फलटण तालुक्यातील गिरवी गावचे शहाजी आणि छाया जाधव याशिक्षक दाम्पत्याच्या मुलगा शुभम याचा विवाह धाराशिव येथील सरोजा व वामनराव कोळगे यांची कन्या ज्योत्क्ना हिच्याशी ठरला आहे. दि. 18 मार्च रोजी फलटण येथे हा विवाह सोहळा होणार आहे. यानिमित्ताने धाराशिवची लेक फलटणची सून होणार आहे. या विवाह समारंभाची पत्रिका छापताना जाधव कुटुंबाने धाराशिव या नामांतराची आवर्जून नोद घेतली आहे. मुलीच्या गावाचे नाव त्यांनी पत्रिकेत धाराशिव असे छापले आहे. शासकीय पातळीवर धाराशिव नावावर अधिकृतरित्या शिंक्कामोर्तब झाल्यानंतर लग्न पत्रिकेवर धाराशिव नाव छापण्याचा पहिला मान जाधव कुटुंबाने पटकावला आहे.
शासकीय पातळीवर नामांतराची मोहोर: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव, असे नामांतर करण्यासाठी शिवसेनेने अखंड परिश्रम घेतले आहेत. लौकिक अथनि या नामांतरावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होण्यास विलंब झाला असला तरी शिवसेनेच्या दृष्टीने हे नामांतर केव्हाच झाले होते. शिवसेनाप्रमुखांपासून शिवसैनिकांपर्यत सर्वच जण गेल्या कित्येक वर्षापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादचा उल्लेख संभाजीनगर व धाराशिव असा करत आले आहेत.जनतेनेही ते स्वीकारल्याचे दिसत होते. फक्त शासकीय पातळीवर मान्यतेची मोहर उठलेली नव्हती.ती मोहोर आता उठली आहे.
नामांतराची घेतलेली नोंद चर्चेचा विषय: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या नामांतराचा क्रांतिकारक निर्णय घेतला. लोकभावना लक्षात घेऊन केंद्रालाही त्याबाबतचे आदेश पारित करावे लागले. शासकीय कागदपत्रांमधून त्याचे प्रतिबिंब हळूहळू प्रतिबिंबित होत जाईल. परंतु, फलटणमधील जाधव कुटुंबाने लग्न पत्रिकेवर नामांतराची घेतलेली नोंद चर्चेचा विषय ठरला आहे.
सोयरिक जुळली आणि संधी साधली: धाराशिव हे नाव शिवसेनेने जनमानसात रुजवलेआहे. त्यामुळे ज्या-ज्या वेळी या शहराच्याअनुषंगाने विषय येतो, त्यावेळी आपोआपच संभाजीनगर आणि धाराशिव असाच उल्लेख होत असे. सोयरिक जुळल्यानंतर मुलाचे लग्न पत्रिकेवर आम्ही मुलीच्या गावाचे नाव धाराशिव छापण्याची संधी साधल्याची प्रतिक्रिया शहाजी आणि छाया जाधव या दाम्पत्याने दिली.