सातारा : कराड विमानतळाच्या संदर्भात शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात मोठे वक्तव्य केले आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राज्यातील 28 विमानतळांच्या कामासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, फडणवीस यांनी मध्यवर्ती असलेल्या कराडच्या सुसज्ज विमानतळासाठी सर्वेक्षण करणार असल्याची घोषणा सभागृहात केली.
स्थानिकांच्या अडचणी सोडविणार : आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, फडणवीस यांनी राज्याच्या मध्यवर्ती भागात एक एअरपोर्ट असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राज्यातील 28 विमानतळांसह कराड येथे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे विमानतळांच्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या अडचणी सोडवल्या जातील. हेलिपॅड देखील बनवण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीसांनी सांगितले कराड विमानतळाचे महत्व : फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराडसारख्या मध्यवर्ती भागात एअरपोर्टची गरज निर्माण झाली. परंतु, स्थानिक लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. इतर सुविधा उपलब्ध करून सुसज्ज विमानतळ केले जाईल.
विमानतळाचा विषय खूप महत्वाचा : फडणवीस यांच्या घोषणेनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना धन्यवाद देत कराडच्या विमानतळाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणचे पहिले विमानतळ यशवंतराव चव्हाण यांनी कराड येथे याच करता केले होते, कारण ते अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे. कराडच्या विमानतळाला गावकर्यांचा विरोध नाही तर काही निधी पाहिजे, त्याबद्दल शासनाने बैठक लावली तर तो प्रश्न मार्गी लागेल. या मागणीवर लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन अंमलबजावणी करू, असे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा -