कराड (सातारा) - कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार निधीतून कराडसाठी स्वतंत्र रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रूग्णवाहिकेचे कराड नगरपालिकेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येकाने स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. मागील वर्षीच स्थानिक विकास निधीतून कराड आणि मलकापूर नगरपालिकेला रुग्णवाहिकेसाठी निधी मंजूर केला होता. मलकापूरची रुग्णवाहिका चार महिन्यापूर्वी सेवेत दाखल झाली असून कराडसाठीही रूग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. कराड शहरासह आसपासच्या गावातील रुग्णांच्या सेवेसाठी या रूग्णवाहिकेचा वापर करावा. तसेच कराडमधील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना कराव्यात, असे सांगून सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगरसेविका शारदा जाधव, राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, सौरभ पाटील, विनायक पावसकर, फारूक पटवेकर, सुहास जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे उपस्थित होते.