सातारा - माण तालुक्यातील म्हसवड येथे हमाली करणाऱ्या एका व्यक्तीची आयुष्यभराची पुंजी प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पोटच्या मुलीनेच हडप केल्याची घटना घडली आहे. या मुलीने सुमारे 14 लाख रुपये हडप केले आहेत. अशी तक्रार त्या मुलीचे वडील विठ्ठल ढगे यांनी म्हसवड पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विठ्ठल बाळू ढगे (वय 57, रा. म्हसवड) हे हमाली करून आपली गुजराण करतात. त्यांची पत्नी नर्मदा हिला पक्षाघात झाला आहे. ती अशिक्षित आहे. त्यांचा मुलगा नितीन हा कामानिमित्त त्याच्या कुटुंबासह म्हसवड येथील शिक्षक कॉलनी येथे राहतो. त्यांची एक मुलगी सीमा ही विवाहित आहे. तर दुसरी मुलगी वंदना ही शिक्षणासाठी पुणे येथे असते. ढगे हे हमाली करुन येणार्या पैशातून कुटुंबाचा खर्च काटकसरीने करत व वंदनाला दरमहा शिक्षणासाठी 10 हजार रुपये पाठवीत होते.
दोन वर्षांपूर्वी आठ दिवस कॉलेजला सुट्टी असल्याचा बहाणा करुन वंदना म्हसवडला आली होती. त्यावेळी वडील ढगे हे हमालीसाठी बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत संशयित आरोपी वंदना हिने आपल्या अशिक्षित व भोळ्या स्वभावाच्या आईस दुसर्या बँकेत जादा व्याज मिळेल यासाठी एसबीआय बँकेतील पैसे काढून दुसऱ्या बँकेत पैसे टाकू असे सांगितले. त्यानंतर ती तिच्या आईला म्हसवड येथील बँकेत घेऊन गेली. तेथील अधिकार्यांना माझी आई आजारी असून तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावयाचे आहेत. आम्हाला पैशाची गरज आहे असे सांगून दि. 23 मे 2016 एसबीआय खात्यामध्ये असणारे 4 लाख 93 हजार 500 रुपयांची रक्कम काढून घेतली. नंतर घरी येऊन घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने तसेच म्हसवड येथील एसबीआय बँकेच्या दुसर्या खात्याचे एटीएम कार्ड पिन नंबर घेवून ती पुण्याला निघून गेली.
याच कालावधीत पुणे येथे जावून वंदनाने विविध एटीएम मधून 8 लाख 19 हजार रुपये काढले. वंदना व तिच्या प्रियकराने संगतमताने तक्रारदार विठ्ठल ढगे यांच्या खात्यातून 8 लाख 19 हजार, तर पत्नी नर्मदा हिचे खात्यातून 4 लाख 93 हजार 500 व सुमारे 55 हजार रुपयांचे दागिने असा एकूण 13 लाख 67 हजार 500 रुपये हडप केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संशयित आरोपी वंदना विठ्ठल ढगे व तिचा प्रियकर राजकुमार ठाकूर शिवदुलारे यांना म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघा संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार खाडे करत आहेत.