सातारा - धोम बलकवडी धरणाचे पाणी नेणारी जललक्ष्मी प्रवाही सिंचन योजनेची जलवाहिनी फुटल्याने शेती व स्ट्रॉबेरी पिकाचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गहू, भाताचेही नुकसान
धोम धरणाच्या लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेल्या धरणाच्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेत जमिनींना पाणीपुरवठा करण्यासाठी धोम बलकवडी धरणातून प्रवाही पद्धतीने जललक्ष्मी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. मागील चार वर्षांपासून या योजनेतून पाणी सोडण्यात येते. सध्या या योजनेचे आवर्तन सुरू असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. आज दुपारी बोरगाव खुर्द (ता वाई) येथील एका शिवारात जलवाहिनी फुटल्याने स्ट्रॉबेरी पीकासह गव्हाचे पेरलेले पीक वाहून गेले. तसेच भाताच्या गंजीत व बुचाडात पाणी शिरल्याने भात पिकाचेही नुकसान झाले.
दाब वाढल्याने जलवाहिनी फुटली
जलवाहिनी फुटून शेतात पाणी शिरल्याने चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली आहे. पाण्याचा दाब वाढल्याने जलवाहिनी फुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जलवाहिनी फुटल्याचे समजताच पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.