सातारा- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूच आहे. धरणात 102.75 टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढतच असुन, बुधवारी सकाळी सकाळी 6 वाजल्यापासुन पाणी पातळी 16 फुटावर स्थिर आहे. धरणातून 122475 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवाजा, महाबळेश्वर येथे धुवांधार पाऊस सुरूच आहे. धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने 14.6 फुटावर स्थिर असलेले वक्र दरवाजे अखेर मंगळवारी सायंकाळी 16 फुटांवर घेतले आहेत. पाटण शहर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने येणारे पाणी व कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पाटणची पूरपरिस्थिती अजुनच गंभीर झाली आहे. तर, कराड चिपळूण राज्य मार्ग हेळवाक पासुन पाण्याने भरला आहे. कोयना नदीवरील सर्वच पुल पाण्याखाली गेल्याने दोन दिवसांपासून वाहतुक पुर्णपणे बंदच ठेवण्यात आली आहे.