सातारा clean survey competition 2023 : स्वच्छ सर्वेक्षणात सातारा जिल्ह्यानं यशाचा पताका फडकवत ठेवलायं. स्वच्छ सर्वेक्षण 2023 सालच्या स्पर्धेत जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी गिरिस्थान या नगरपालिकांनी पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावलाय. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देशाच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांचा समावेश असून 11 जानेवारीला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
पाचगणीनं केली पुरस्काराची हॅट्रिक : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेनं 2023 साठीचा देशपातळीवरील पश्चिम विभागातील प्रथम क्रमांकाचा सलग तिसरा पुरस्कार प्राप्त करीत हॅट्रिक केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देश आणि राज्य पातळीवर विभागनिहाय क्रमांक दिले जातात. यापूर्वी 2018 साली पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेला स्वच्छ्ता अभियानात पश्चिम विभागात पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2021 आणि आता तिसऱ्यांदा पुरस्कार पटकावत पाचगणीनं पुरस्कारांची हॅट्रिक केली आहे. सध्या नगरपालिकेवर प्रशासक असून प्रशासकीय कार्यकाळात पुरस्कार मिळाल्यानं या पुरस्काराचं वेगळं महत्त्व आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात कराडची घोडदौड : स्वच्छ सर्वेक्षणात कराड नगरपालिकेची घोडदौड कायम आहे. देशाच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये कराड नगरपालिकेनं प्रथम क्रमांक पटकावलाय. यापूर्वी 2019, 2020 अशी दोन वर्षे देशात प्रथम, 2021 साली सहावा तर 2022 साली देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. दरम्यान, या यशाबद्दल पाचगणीसह कराडकर नागरिकांनी जल्लोष साजरा केला.
हेही वाचा -
- Honored by President Draupadi Murmu : स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईने देशात पटकाविला तिसरा क्रमांक
- स्वच्छ सर्वेक्षणमध्ये साताऱ्याचा डंका.. पाचगणी ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर.. तर कराडला तृतीय क्रमांक
- स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विट्यासह खानापूर नगरपंचायतींची उल्लेखनीय कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान