सातारा : छत्रपती संभाजीराजेंचा महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रपुरुष तसेच थोर व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या गोष्टीचा पाठपुरावा सुरू होता. यावर छत्रपतींचे थेट वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हेसुद्ध बऱ्याचदा बोलले होते. दरम्यान, कार्यकर्त्यांचीही मागणी होती. ती आता शिंदे-फडणवीस सरकारने पुर्ण केली आहे. त्यावर छत्रपती घराण्याचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल आपल्या पाठपुराव्याला आणि शंभुभक्तांच्या लढ्याला यश आल्याचा मनस्वी आनंद झाला आहे असे म्हणत, जय शिवराय, जय शंभूराजे! असे ट्विट उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
शंभू भक्तांच्या लढ्याला यश : राष्ट्रपुरुष तसेच थोर व्यक्तींच्या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा समावेश करावा, यासाठी महाराष्ट्रातील सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आजपर्यंत अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला व शंभुभक्तांच्या लढ्याला यश आल्याचा मनस्वी आनंद वाटत आहे. सर्व शिव-शंभू भक्तांच्या आणि शिवप्रेमींच्यावतीने महाराष्ट्र शासनाचे आणि खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार उदयनराजेंनी आभार मानले आहेत.
महाराणा प्रताप यांनाही अभिवादन : महापराक्रमी योद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले आहे. त्याग, बलिदान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांचे साहस सदैव आपणास प्रेरणा देत राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अमोल कोल्हेंनीही वेधलेले लक्ष : राज्स सरकारच्यावतीने तयार करण्यात आलेल्या थोर महापुरुषांच्या दिनविशेष यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नसल्याकडे खासदार अमोल कोल्हे यांनी दोन वर्षापुर्वी सरकारचे लक्ष वेधले होते. याबाबतीत लक्ष घालून शासनाने त्वरित सुधारणा करावी, असी मागणीही त्यांनी केली होती.
हेही वाचा : शिंदे-फडणवीस जोडी येताच विकासाला गती; पंतप्रधानांकडून सरकारचे कौतूक