सातारा - दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची फी माफी शासनाने केली असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी म्हसवड येथील सभेत केले होते. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या प्रथम आणि द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली. तसेच ज्या विद्यार्थ्यांना फी भरली नाही. त्यांना लेट फी चा दणका देऊन सक्तीने पैशाची वसुली केली. या विषयासंबधी चंद्रकांत पाटलांना विचारणा केली असता, 'मला फी माफी झाली नसल्याचा पुरावा द्या' असं सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली.
माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना चंद्रकांत पाटील यांनी शासनाने ८ योजना राबवल्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची फी माफी केली, शासनाकडून रस्ते, वाहतूक, टँकर पाणी पुरवठा, चारा, या योजना तात्काळ अंमलबजावणी करत असल्याचे सांगितले. मात्र यामधील अनेक योजना फक्त कागदोपत्रीच असल्याचे समोर आले आहे. कारण विद्यार्थ्यांची परीक्षा 'फी' माफीचा शासनाने डिसेंबरमध्ये परिपत्रक काढले.
मात्र त्याची अंमलबजावणी विद्यापीठाने आजपर्यंत केली नाही. विद्यार्थ्यांकडून फी वसुली तसेच 'लेट फी, सुपर लेट फी' म्हणून सक्तीने पैसे वसूल केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची फी माफी केली यावरती बोलताना चंद्रकांत पाटील यांनी 'एखादे उदाहरण माझ्यासमोर आणून द्या आपण ते पाहू...' असे बोलून प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता विद्यापीठाने, महाविद्यालयांनी शासनाच्या परिपत्रकाला कसलीच दाद न देता विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसुली फी घेतली आहे.
त्यामुळे राज्यातील मुख्य आणि जबाबदार असलेले मंत्री पत्रकारांना सुद्धा खोटे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासकीय अधिकारी तसेच दुष्काळी दौऱ्यावर येणारे मंत्री फक्त आश्वासनांच्या योजना शेतकऱ्यांना देत आहेत. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसह शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे.