कराड (सातारा) - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना भारतात मात्र पेट्रोल १०० रुपये, डिझेल ९२ तर स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपयांवर पोहोचला आहे. केंद्रातील मोदी सरकारची ही दरवाढ नसून जनतेच्या खिशातून करवाढ वसुली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत केला आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून कर रूपाने कोटी रुपये नफा मिळवित सामान्यांना महागाईच्या खाईत लोटले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
सामान्यांना महागाईच्या खाईत लोटले -
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे कराड शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. इंधन दरवाढ अशीच चालू राहिली तर महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण होईल. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून कर रूपाने कोटी रुपये नफा मिळवित सामान्यांना महागाईच्या खाईत लोटले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
हे सामान्य जनतेचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्याचे -
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली २०१४ च्या अगोदर काँग्रेस प्रणित युपीए सरकार सत्तेत होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम होऊ दिला नव्हता. युपीए सरकारच्या काळातील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि सध्याच्या मोदी सरकारच्या काळातील किमतीशी तुलना करता त्या जवळपास ५० टक्के कमी आहेत. तरीही मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा प्रसंगी मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही मोदी सरकारचा निषेध करतो, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हेही वाचा - 'पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला 'महागाईचा विकास' दिसेल'; राहुल गांधींची टीका