सातारा- मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वर सर्वत्र ओळखले जाते. दोन व्यक्तींनी मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर परिसरातील 4875 एकर 25 आर क्षेत्र विकायला काढले होते. साताऱ्यातील एका वकिलाने आणि त्याच्या मित्राने हा प्रताप केला आहे. हा प्रकार समोर येताच अनेक जणांनी कपाळावर हात मारुन घेतला आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
साताऱ्यातील वकील व त्याच्या मित्राने पुण्यातील वैभव लक्ष्मण गिरी यांना महाबळेश्वरमधील जमीन नावावर करुन देण्याचे आमिष दाखवले. गिरी यांच्याकडून त्यासाठी 25 लाख रुपये घेण्यात आले. जमिनीचा ताबा देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने गिरी यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अॅड.रविराज गजानन जोशी व सुहास लक्ष्मण वाकडे या दोघांविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
वैभव गिरी व आरोपी जोशी व वाकडे यांची सातारा येथे ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा महाबळेश्वर मध्ये भेट झाली. महाबळेश्वर मध्ये असणारे वेण्णालेक, प्रतापगड, लिंगमळा याठिकाणी कै. दत्ता भैरव पिंगळे यांची इनामी जामीन मिळाली आहे. त्यांचे वारस या ठिकाणी राहतात त्यांची चांगली ओळख आहे. जोशी आणि त्याचा मित्र सुहास वाकडे जमीन मिळवून देण्याचे आश्वासन गिरी यांनी दिले. वैभव गिरी व माधवी ओतरी यांच्या नावे जमिनीबाबत पुण्यात नोटरी देखील करुन घेण्यात आली. यानंतर अॅड.जोशी आणि वाकडे यांनी 25 लाख रुपये घेतले.
काही दिवसांनी जमिनीचा ताबा देण्यासाठी वैभव गिरी व माधवी ओतरी यांनी मागणी केली असता आरोपींनी टाळाटाळ केली. गिरी व ओतरी महाबळेश्वर मध्ये जमीन मालक पिंगळे यांना भेटायला गेले होते. महाबळेश्वरमध्ये पिंगळे नावाचे कोणी राहत नसल्याचे त्यांना समजताच त्यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत अॅड. रविराज जोशी व सुहास वाकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.