सातारा - एका प्राथमिक शिक्षिकेला त्रास देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सातारा तालुका पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्यावर काल रात्री तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 'आपल्या दोघांत झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुझे शैक्षणिक कामकाज खराब करून नोकरी घालवतो' अशी धमकी दिली असल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
दोन वर्षे देत होता त्रास -
जिल्हा परिषदेच्या सातारा तालुक्यातील एका प्राथमिक मराठी शाळेत एका 40 वर्षीय महिला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या शिक्षिकेला गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ 2018 पासून सतत त्रास देत होता. यादरम्यान, धुमाळ याने शिक्षिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून कामावर असताना तीला त्रास दिला. यानंतर तीच्याकडे एक टक बघत 'तुम्हांला तुमच्या घरी माझ्या गाडीतून सोडतो' असेदेखील अनेकवेळा म्हटले. तसेच 'तुला माझा आधार होईल. तुला येथून पुढे शाळेत कसलाही त्रास होणार नाही. तुझ्याविषयीच्या सर्व तक्रारी मी निकली काढीन. या तक्रारी, तू मला मिळावी म्हणून मी मुद्दाम केल्या होत्या, असे धुमाळ याने त्या शिक्षिकेला सांगितले. त्यानंतर धुमाळ यांनी त्या शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र शिक्षिकेने नकार दिल्यानंतर 'तू मला नकार देऊ नकोस, असे बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
नोकरी घालवण्याची धमकी -
'आपल्या दोघात झालेला प्रकार कोणाला सांगितला, तर तुझे शैक्षणिक कामकाज खराब करून तुझी नोकरी घालवतो' अशी धमकीही त्याने पीडितेला दिली होती. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - पुण्यात कडक निर्बंध, दुपारी ४ नंतर ही दुकाने बंद, जाणून घ्या नवीन नियमावली