सातारा - वडूज नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील हिंदुराव गोडसे यांसह सहा जणांविरुद्ध माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक संदीप निवृत्ती गोडसे यांच्या तक्रारीवरून सावकारकीसह अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. विविध कलमान्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने परिसरात राजकीय दृष्ट्या खळबळ माजली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, नगरसेवक संदीप निवृत्ती गोडसे यांना जून, 2014 मध्ये लोकांचे देणे भागविण्यासाठी व औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने नगराध्यक्ष सुनिल हिंदुराव गोडसे, सचिन तुकाराम माळी, जयवंत माधवराव पाटील यांना बोलून दाखविले होते. त्यावेळी सुनील गोडसे यांनी तुम्हाला रक्कम उसनबार देतो तुम्ही सवडीने परत करा. नाममात्र वार्षिक 15 टक्के प्रमाणे व्याज द्या, असे ही त्यांनी सांगितले. त्यांनी दि. 22 मार्च, 2019 रोजी सुनिल गोडसे यांच्याकडून आई व वडिलांच्या दवाखान्यासाठी 9 लाख रुपये पत्नी नम्रता गोडसे ह्यांच्या नावे चेक देवून रक्कम व्याजाने घेतली होती. या रक्कमेच्या व्याजापोटी नम्रता गोडसे यांच्या गळ्यातील सर्व सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून व पैसे जमवून व्याजापोटी सुनिल गोडसे यांना दिले होते.
तसेच जेसीबी खरेदीसाठी सुनिल हिंदुराव गोडसे यांच्याकडून 11 लाख रुपयांची मदत मागितली. ही रक्कम वडूज शाखेच्या कराड अर्बन बँकेच्या खात्यातून संदीप गोडसे यांना ट्रान्सफर केले. या रक्कमेपोटी वेळच्यावेळी व्याज दे असे बजावले. त्यानंतर 20 जानेवारीला 23 लाख रुपये सुनिल गोडसे यांना जगदीश विठ्ठल गोडसे याच्या समक्ष परत केली. तद्नंतर दि. 14 जून, 2019 रोजी वडूज नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक लागली. त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठी सुनिल गोडसे यांनी जर तू मला मदत केली नाही तर मला उसणवार घेतलेल्या रक्कमेचे सावकारी पध्दतीने जादा व्याजाची रक्कम द्यावी लागेल अशी धमकी दिली. तसेच माजी उपनगराध्यक्ष विपूल गोडसे, जयवंत पाटील, राजेंद्र चव्हाण, सचिन माळी (सर्व रा. वडूज) यांनी संदीप गोडसे यांना उचलून हरणेबंदर, कोल्हापूर, पुणे, लोणावळा, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी नेऊन ठेवले होते. त्या दरम्यान संदीप किसन गोडसे व प्रदिप किसन गोडसे (दोघे रा. वडूज) यांनी संदीप गोडसे यांच्या घरावरती लक्ष ठेवून सतत घरातील लोकांना भितीचे छायेखाली ठेवले होते. नगराध्यक्षपदी सुनिल गोडसे निवडून आल्यानंतर उसनवार घेतलेल्या रक्कमेची जादा आकारणी करुन त्यासाठी धमकीचे फोन करत आहेत. तसेच जयवंत पाटील गावात आल्यावर अडवून तुम्ही सुनिल गोडसे यांचे पैसे परत द्या, असे म्हणून तसेच आमच्या विरुध्द तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली आहे.
सर्व रक्कम त्यांना परत दिली असताना आता विनाकारण नाहक पैशाच्या वसुलीसाठी त्रास देत आहेत. तसेच कुटुंबीयांना गुंडाच्या मदतीने वारंवार जीवे मारण्याची व घर सोडून जाण्याची धमकी देत आहेत. संदीप किसन गोडसे, प्रदिप किसन गोडसे हे घरी येऊन सुनिल गोडसे यांचे पैसे परत दे नाहीतर आता व्याजाचे पैसे दे असे म्हणून मला व आमच्या घरातील लोकांना दगड व काठ्यांनी मारहाण केली. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुनिल गोडसे, विपुल पोपटराव गोडसे. जयवंत माधवराव पाटील, राजेंद्र बाळकृष्ण चव्हाण, सचिन तुकाराम माळी, सदिप किसन गोडसे, प्रदीप किसन गोडसे (सर्व रा.वडूज) यांनी आपसात संगणमत करुन घरी येवुन व्याजाची रक्कम देत जा नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
अशा प्रकारची फिर्याद संदीप निवृत्ती गोडसे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली असून नगराध्यक्ष सह सहा जणांच्या विरोधात सावकारकी व संगनमताने अपहरण केल्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक पाटील करीत आहेत.
हेही वाचा - 25 लाखाच्या खंडणी प्रकरणी मुलाची हत्या, आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी