सातारा - पाचगणी-महाबळेश्वर येथे सुटीसाठी आलेल्या एका पर्यटक दांपत्याची कार दांडेकर थांब्यावरून थेट दरीत कोसळली. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. प्रचंड काळोख असल्याने पोलिसांना आणि ट्रेकर्सना बचावकार्य करण्यात अडथळा येत होता. रात्री आठ वाजता जखमी पतीला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र, रात्री उशीरापर्यंत पत्नीचा शोध लागला नाही. अखेर सोमवारी पहाटे पत्नीचा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला.
कुमेद बिलल खटाव (32) असे जखमी पतीचे नाव आहे. त्याला पाचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, सना कुमेद खटव (30) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
हेही वाचा... सीसीटीव्हीच्या आधारे दोन तासातच लागला चोरट्याचा शोध
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्रीच पाचगणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. महाबळेश्वर ट्रेकर्सला बोलवण्यात आले आहे. कारमध्ये दोघे पती-पत्नी होते. त्यापैकी जखमी अवस्थेत असलेल्या कुमेद यांना बाहेर काढण्यात टेकर्सला यश आले होते. मात्र, त्यांची पत्नी सना दरीत पडल्याने तिचा शोध सुरू होता.
शनिवार-रविवारच्या सुटीनिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने या परिसरात फिरण्यासाठी येतात. सदर पती-पत्नी देखील एका कारमधून आले होते. रविवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पाचगणीतील दांडेकर या ठिकाणी ते फिरण्यासाठी गेले. मात्र, कारवरचे नियंत्रण सुटल्याने ती सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळली.
हेही वाचा.. ठाण्यात संजय गांधी उद्यानात पेटला वणवा
रात्री आठ वाजता महाबळेश्वर टेकर्सने कार चालकाला दरीतून बाहेर काढले. त्याला पाचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कारमध्ये त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता. अखेर सोमवारी तिचा मृतदेह ट्रेकर्सना सापडला.