सातारा - वाई येथील एका बंगल्याच्या खोलीमध्ये गांजा शेती केली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून ते दोघेही जर्मन नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
गांजाची २५० झाडे
वाई येथील विष्णू श्री स्मृती या बंगल्यामध्ये दोन जर्मन नागरिक भाड्याने राहतात. गेल्या दीड वर्षापासून ते येथे राहतात. त्यांनी बंगल्यातील रुममध्ये गांजा सदृश्य शेती केली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे काल (सोमवारी) रात्री सातारा पोलिसांनी छापा टाकला असता बंगल्याच्या खोलीत गांजा सदृश्य सुमारे अडीचशे झाडे आढळून आली. त्याचप्रमाणे गांजावर प्रक्रिया करणारी संयंत्रणा आढळली.
फॉरेन्सिक लॅबची मदत
पोलिसांनी दोन्ही जर्मन नागरिकांना ताब्यात घेतले असून आज न्यायालयासमोर उभे करण्यात आले. जप्त केलेली वनस्पती गांजाच आहे की नाही याबाबत तपासणी करण्यासाठी पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबच्या टीमला पाचारण करण्यात आले होते.
चौकशी सुरू
ताब्यात घेण्यात असलेल्या दोन्ही जर्मन नागरिकांवर २०१७ मध्ये गोव्यात याच प्रकारचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. गेल्या सव्वा वर्षापासून हे दोघे वाईत भाड्याने बंगला घेऊन राहत होते. त्यांनी बंगल्याच्या रुम्समध्येच गांजाची सुमारे अडीचशे झाडे लावली होती. या प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण माहिती समोर येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.