सातारा - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विधेयकाच्या समर्थनार्थ कराड शहर भाजपतर्फे सोमवारी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समर्थकांनी दोन्ही विधेयकांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच दोन्ही विधेयकांच्या समर्थनाचे निवेदन कराड प्रांताधिकार्यांना दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून समर्थन रॅलीला प्रारंभ झाला. घुसखोरांना हाकलून द्या, कायद्याचा सन्मान हाच देशभक्तीचा सन्मान, ज्यांचे देशावर नाही प्रेम, त्यांना नाही कोणताच अधिकार, या देशात राहायचे असेल, तर घटनेला मानावेच लागेल, अशा आशयाची पोस्टर्सही रॅलीत झळकली. कराडच्या मुख्य बाजारपेठेतून रॅली दत्त चौकात आली. यावेळी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात आले. कराडच्या प्रांताधिकार्यांना भाजप पदाधिकार्यांनी दोन्ही विधेयकांच्या समर्थनाचे निवेदन दिले. समर्थन रॅलीमध्ये कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शहर भाजपचे अध्यक्ष एकनाथ बागडी, हिंदू एकता आंदोलनाचे नेते विनायक पावसकर, विष्णू पाटसकर, सुदर्शन पाटसकर, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, स्वाती पिसाळ, सुदर्शन पाटसकर, मुकुंद चरेगावकर, केदार डोईफोडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.