सातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही धडाडीचे नेते आहेत. त्यामुळे निश्चितच भाजप पाच वर्षे गतिमान व स्थिर सरकार देईल, असा विश्वास वाटतो. भाजप सरकार सत्तेत आले ही आमच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. मात्र, अवकाळी पाऊस व त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ही बाब लक्षात घेता आनंदोत्सव साजरा करणे मनाला पटत नाही. भाजप सरकारमुळे राज्यातील विकासाला व पर्यायाने साताऱ्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या गटनेत्याचा आम्हाला पाठिंबा, आम्ही स्थिर सरकार देऊ - दानवे
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. सातारा व जावळी तालुक्याच्या विविध भागातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी गर्दी करून परस्परांचे अभिनंदन केले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भावना प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्या.
"देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, याची खात्री आम्हा सर्व कार्यकर्त्यांना होती. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी आधीच आश्वासित केले होते. त्यामुळे भाजप सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट होते. स्थिर सरकार मिळणे ही राज्याची गरज होती. मंत्रिपदे व इतर गोष्टी या नंतरच्या बाबी आहेत. भाजप सरकार सत्तेत आल्यामुळे विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - शिवसेनेचा 'पोपट' होण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकरांनी दिला होता इशारा
आज सकाळी झालेल्या राजकीय घडामोडी या आम्हालाही अनपेक्षित होत्या. तथापि काही राजकीय निर्णय हे तातडीने घ्यायचे असतात, त्याप्रमाणे निर्णय झाला. भाजपचे सरकार सत्तेवर येणे हे आम्हा सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते."
मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सर्व आमदारांची बैठक घेतली त्यात त्यांनी भाजपला घेतल्याशिवाय सरकार होऊ शकत नाही, असा विश्वास दिला होता. त्यांच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसत होता. श्री फडणवीस जे त्यावेळी बोलले ते त्यांनी करून दाखवले, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.