सातारा - मुलीस पळून जाण्यास मदत केल्याच्या रागातून गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण व विनयभंग केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यात घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी दोन महिलांसह सहा संशयित फरार झाले आहेत.
म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सासू-सासऱ्यांसह माण तालुक्यात राहते. तिचा पती नोकरीनिमित्त पुण्यात असतो. ही महिला तीन महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या दिराने यातील संशयित संजय श्रीरंग तुपे यांच्या मुलीशी एक महिन्यांपूर्वी पळून जावून प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे संजय तुपे व त्यांच्या कुटूंबातील लोक पीडितेला व तिच्या कुटूंबियांना वारवार शिवीगाळ करत होते.
२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पीडिता घरी असताना मिनाक्षी संजय तुपे, साकरुबाई विष्णु तुपे, कल्पना आण्णा तुपे, संतोष विष्णु तुपे, संजय श्रीरंग तुपे, आण्णा श्रीरंग तुपे हे सर्वजण घरासमोर गेले. "आमच्या पोरीला तु पळवून न्यायला मदत केलीस. तुला आता सोडणार नाही, तुझ्या पोटातील बाळ आता येवू देणार नाही" असे म्हणत मिनाक्षी हिने त्या महिलेचा हात धरुन ओढले. तेवढ्यात साकरुबाई, कल्पना, संतोष, संजय, आण्णा यांनी पीडितेस शिवीगाळ करत मारहाण केली.
पीडितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या घराशेजारील लोक मदतीसाठी धावले. त्यांनाही संशयितांनी "तुम्ही या ठिकाणी थांबायचे नाही" असे म्हणाल्याने त्या दोघी तेथून निघून गेल्या. त्यानंतर साकरुबाई व कल्पना यांनी पीडितेला गोडबोलून वालुबाईच्या शिवारात नेले. तेथे साकरुबाई, कल्पना व मिनाक्षी तुपे या तिघींनी तिला हाताने ओढत डोंगरावर खेचत नेले. साकरुबाई व मिनाक्षी यांनी पीडित महिलेस उपस्थितांसमक्ष पूर्ण विवस्त्र करुन लाथा-बुक्यांनी मारहाण केली. या झटापटीत पीडितेचे दीड तोळ्यांचे सोन्याचे मणीमंगळसूत्र तुटून गहाळ झाले.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन मिनाक्षी संजय तुपे, साकरुबाई विष्णु तुपे, कल्पना आण्णा तुपे, संतोष विष्णु तुपे, संजय श्रीरंग तुपे, आण्णा श्रीरंग तुपे (सर्व रा. खडकी पाटोळे) यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.