सातारा - राज्यात आमचे आघाडी सरकार चांगले काम करत आहे. सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांत चलबिचल आहे. त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा विरोधीपक्ष प्रयत्न करतोय. त्यामुळे राज्यात सरकार बदलणार, हे सांगण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीला भेट दिल्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सोनल पटेल, अॅड. सुरेश कुराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, रजनी पवार, धनश्री महाडिक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते.
जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा पुढाकार -
जिल्हा काँग्रेस कमिटीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी व जातीयवादी पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचा पुढाकार होता. देश सांभाळावा असे नेतृत्व बाबांचे आहे. काळाच्या ओघात काहीही होऊ शकते, असे स्पष्ट केले.
जिल्ह्यात काँग्रेसला निश्चित फायदा होईल -
शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे दिले. आता नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांवरील कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अतिवृष्टीतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यात विलासकाका आणि पृथ्वीराजबाबा एकत्र आले. याचा जिल्ह्यात काँग्रेसला निश्चित फायदा होईल, असेही थोरात म्हणाले.
हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना जमिनीच्या स्वरुपात मदत देण्याबाबतचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता 'जमिनीची उपलब्धता लक्षात घेता, या यासंदर्भात शासन लवकरच धोरणात्मक निर्णय घेईल' असे थोरात यांनी स्पष्ट केले.
गोस्वामी प्रकरणात लोकशाहीमूल्यांचा प्रश्न येत नाही -
अर्णव गोस्वामी प्रकरणावर बोलतांना थोरात म्हणाले, गोस्वामी प्रकरणात लोकशाहीमुल्यांचा प्रश्न येत नाही. त्यांच्यावर ज्या प्रकरणी कारवाई झाली तो विषय वेगळा असून राजकीय नाही. सुसाईड नोटमध्ये गोस्वामींच नाव आहे. त्यांच्यावर नाईक कुटुंबिय आरोप करत आहेत. मागील सरकारने हे प्रकरण दाबून ठेवले होते. आता पोलीस चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस न्याय मार्गाने जात आहेत.
भाजपला जातीय विचार माथी मारायचाय - पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेस कमिटीत मार्गदर्शन करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी साम, दाम, दंड, भेदचा वापर केला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४० हून अधिक नेते त्यांच्याकडे गेले. निवडणूक आयोग, सीबीआय यासह अनेक संस्था भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपला जातीयवादी विचार लोकांच्या माथी मारायचा आहे, अशी जोरदार टिकाही चव्हाण यांनी यावेळी केली.
हेही वाचा- टीआरपी घोटाळा: पोलिसांनी विनाकारण त्रास देऊ नये; 'हंस'च्या याचिकेवर न्यायालयाची पोलिसांना सूचना
हेही वाचा- मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांनी घेतली नवी दिल्लीतील सरकारी वकिलांची भेट