सातारा : बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आम्हाला प्रसारमाध्यमांकडून मिळाली. हा पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे या विषयावर मी काहीही भाष्य करणार नाही, असे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
पक्षश्रेष्ठींकडून चौकशी सुरू : बाळासाहेब थोरात यांना मी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. नाशिक पदवीधर निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या. त्यामुळे विधिमंडळातील काँग्रेसची एक जागा कमी झाली आहे. ही बाब गंभीर असून हे सर्व टाळता आले असते का? याची पक्षश्रेष्ठींकडून चौकशी सुरू असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कार्यकारिणी बैठकीत सविस्तर चर्चा : नाशिक पदवीधर निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १५ फेब्रुवारीला कार्यकारिणी बैठक बोलावली आहे. या बैठकीस प्रभारी एच. के. पाटील उपस्थित राहणार आहेत. बैठकीत घडामोडींची सविस्तर चर्चा होईल, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
भाजपमध्ये निम्मे लोक कॉंग्रेसचेच : प्रत्येक घडामोडीत भाजपचा हात असतोच. स्वतःच्या ताकदीवर त्यांना काही मिळवता येत नाही. भाजपमधील आमदारांची संख्या पहिली, तर निम्मे लोक कॉंग्रेसचेच पाहायला मिळतील, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
बाळासाहेब थोरातांनी केले सत्यजीत तांबेचे अभिनंदन : या संपूर्ण घडामोडीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या महिनाभरातील राजकारण अस्वस्थ करणारे आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. यावर बोलणे मला योग्य वाटत नाही. पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य तो निर्णय घेऊ. काँग्रेसचा विचार हाच आमचा विचार आहे. यातील काहींनी भाजपमध्ये प्रवेश तर, केलाच पण भाजपची तिकिटेही मिळवली. काही लोक जनतेचा गैरसमज करून घेत आहेत. ते योग्य वाटत नाही. मात्र, काँग्रेसचा दृष्टिकोन आमचा आहे. आत्तापर्यंत चळवळ याच विचारांवर आधारित होती. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विचारांवर चालत राहील, अशी ग्वाही देत यापुढील काळात जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. नाशिक पदवीधर मतदारसंघातून विक्रमी बहुमताने विजयी झालेले युवा आमदार सत्यजित तांबे यांचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा - Nana Patole : प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी नाना पटोले दिल्लीला जाणार? ऐका ते काय म्हणाले