सातारा - एकतर्फी प्रेमात अपयशी झाल्याने सूडभावनेतून बालकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. अभिजित रामदास लोखंडे (वय 28, रा. तडवळे, ता. फलटण जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
'मला परत फोन, मेसेज करु नकोस. नाहीतर तुझे हे प्रकार घरातल्यांना सांगेन' हेच शब्द आरोपीच्या वर्मी लागले. आपले एकतर्फी प्रेम संपुष्टात आल्याच्या जाणिवेने तो बिथरला. याच रागातून त्याने अवघ्या 10 महिन्यांच्या बालकाचा क्षणाचाही विचार न करता विहिरीत फेकून खुन केला. फलटण तालुक्यातील अपहृत बालकाच्या खुन्याचा छडा कसा लागला याची तपशिलवार माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले की, काळजमधील बालक अपहरण व खुनाचा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. बालकाच्या आईवर या संशयिताचे एकतर्फी प्रेम होते. मात्र, त्या बालकाची आई त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. भेटणे, बोलणेही टाळत होती. काही दिवसांपुर्वी दोघांत याच कारणावरुन वाद झाला. तिने तरुणाला परत फोन, मेसेज, भेटण्याचा प्रयत्न करु नकोस, असे सांगितले. त्यावरुन त्यांचे भांडणही झाले. याचा राग मनात धरुन अभिजित लोखंडे याने मंगळवारी बालकाचे अपहरण केले. तसेच त्याला जवळच्या विहिरीत टाकून तो पसार झाला.
संशयिताने गुन्ह्याचा कट आधीच रचला होता. त्यासाठी त्याने भगत यांच्या घराची टेहळणी केली. घरात कोण कोण आहे. भोवतालची परिस्थिती कशी आहे. कुठून यायचे, कुठून जायचे, हे त्याने ठरवले होते. कुटुंबातील लोक बाजरी काढायला शेतात जात आहेत, हे त्याला माहित झाले होते. यानंतर त्याने मनातील डाव साध्य केला.
असा झाला तपास -
स्थानिक स्तरावर माहिती घेत असताना पोलिसांना बाळाच्या आईस शेजारील गावातील तरुण एकतर्फी प्रेमातुन वारंवार तिचा पाठलाग करुन त्रास देत असल्याचा धागा हाती लागला. पोलिसांनी काही संशयितांची चौकशी केली. त्यात अभिजित लोखंडे याच्यावरील संशय पक्का झाला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दिशाभुल करणाऱ्या 10-12 कहाण्या त्याने रचल्या.
तांत्रिक विश्लेषण आणि संशय या आधारे पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयिताला तोंड उघडावे लागले. हा गुन्हा बाळाच्या आईवर करत असलेल्या एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याच्या रागातुन केला असल्याची कबुली त्याने दिली.