सातारा - कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे शनिवारी एका ९ महिन्यांचा बालिकेचा मृत्यू झाला. या बालिकेला कोरोनाची लागण झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, तिचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये श्वसनसंस्थेचा तीव्र जंतू संसर्ग झाल्यामुळे नऊ महिन्यांच्या बालिकेला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या घशातील स्त्रावाचा पृथक्करण अहवाल रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला मिळाला. या बालिकेसह कृष्णा हॉस्पिटलमधील तिन्ही कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा - देशभरात कोरोनाचे 3 हजार 113 रुग्ण; दिवसभरात 11 हजारांपेक्षा जास्त चाचण्या - आयसीएमआर
दरम्यान, कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. देशभरामध्ये शनिवारपर्यंत 3 हजार 113 कोरोनाग्रस्त आढळून आले असून आज दिवसभरात 11 हजार 182 जणांची चाचणी घेण्यात आल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिली आहे. या 11 हजार 182 जणांपैकी 324 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.