कराडा (सातारा) - पतीच्या निधनामुळे आपण व्यथित झालो असून त्यांच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, अशी चिठ्ठी लिहून ठेवून आईने पोटच्या दोन मुलांचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर हाताची नस कापून स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी कराडच्या वाघान परिसरात घडली.
![अनुष्का आवटे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12874649_satara.jpg)
हर्षद व आदर्श आवटे अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर अनुष्का आवटे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मातेचे नाव आहे. अनुष्का आवटे यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाले आहे. पतीच्या निधनामुळे आपण व्यथित झालो असून त्यांच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, अशी चिठ्ठी लिहून ठेवून अनुष्का आवटे हिने पोटच्या दोन मुलांना गळा दाबून संपवले. तसेच स्वतः हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी घरात धाव घेतली. त्यावेळी ती अत्यवस्थ होती. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.