सातारा : ग्रामीण भागात मधमाशांचे हल्ल्यात वाढ होत आहे. लोहारे (ता. वाई) येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा विधी सोमवारी होता. गावातील नागरिक तसेच आजुबाजूच्या गावातील नातेवाईक मिळून साठ-सत्तर जण स्मशानभूमीत उपस्थित होते. विधी झाल्यानंतर स्मशानभूमीतून बाहेर पडत असतानाच मधमाशांनी नागरीकांवर हल्ला केला. त्यामुळे सर्वजण सैरावैरा पळू लागले. मधमाशांनी २५ जणांना दंश केला. त्यामध्ये महिला व पुरुष नातेवाईकांची संख्या जास्त होती.
चौघांची प्रकृती गंभीर: जखमींना तातडीने वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदवला आहे. जखमींमध्ये लोहारे आणि गुळूंब (ता. वाई) येथील नातेवाईकांची संख्या जास्त आहे.
अभिनेता सयाजी शिंदेंना मधमाशांचा दंश : या आधीही शहरात मधमाशांचा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सातारा-कोल्हापूर महामार्ग रुंदीकरणाच्या कामात तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्रोपण सुरू असताना, १४ मार्च २०२३ रोजी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केला होता. तसेच एक वर्षापूर्वी सातारा तालुक्यातील शिवाजीनगर येथे डोंगरावर ग्रामदैवताच्या यात्रेतही मधमाशांनी हल्ला केला होता. मधमाशांपासून वाचण्यासाठी पळताना पाय घसरुन दरीत पडल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
लोकांनी सावधगिरी बाळगावी: ग्रामीण भागात मधमाशांचे हल्ल्यात वाढ होत आहे. मधमाशांचे हल्ले टाळण्यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगावी. करावेत. मधमाशांच्या पोळ्यांना त्रास देवू नये. तसचे हल्ला झाल्यास, लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावे आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
हेही वाचा -