कराड (सातारा) - मध्य चीन, दक्षिण आशियासह मध्य आशियात आढळणार्या आणि सर्वाधिक उंचीवरून उडणार्या पट्टेवाल्या बदकांचे खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी तलावावर आगमन झाले आहे. सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणारा आणि डोक्यावरील काळ्या पट्ट्यांमुळे पट्टेवाला बदक (बार हेडेड गुज) म्हणून ओळखल्या जाणार्या या पक्ष्याच्या अभ्यास आणि निरीक्षणाची पर्वणी यानिमित्ताने पक्षीप्रेमींना मिळाली आहे. त्यामुळे सूर्याचीवाडी तलावावर पक्षीप्रेमींची गर्दी वाढत आहे.
व्हिडिओ सौजन्य - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, पक्षीतज्ज्ञ सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणारा पक्षी - बार- हेडेड गुज (अन्सर इंडिकस), पट्ट कादंमब अशा शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणार्या या पक्ष्याला पट्टेवाला बदक असेही म्हटले जाते. सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणारा हा पक्षी आहे. फिकट राखाडी रंग आणि डोक्यावर दोन काळ्या पट्ट्यांमुळे हा पक्षी सहज ओळखून येतो. त्याचे पाय आणि चोच नारंगी-पिवळी असते. चोचीच्या शेवटी राखाडी ठिपका असतो. या पक्षाची लांबी 71 ते 76 सें.मी. पर्यंत असते आणि वजन साधारण 1.87 ते 3.2 किलो पर्यंत असते. हा पक्षी पूर्णतः शाकाहारी आहे. पट्टेवाला हंस हा पक्षी तलावातील शेवाळ, गवत, गवताचे बी, ज्वारी, शाळू इ. खातो.
हिवाळ्यात करतात भारतात स्थलांतर -मध्य चीन, मंगोलिया, कझाकिस्तान, रशिया, तिबेट, दक्षिण आशियातील पर्वतीय तलाव आणि मध्य आशियात बार- हेडेड गुज तथा पट्टेवाला बदक आढळतो. तेथे त्यांचे प्रजनन होते. जमिनीवर, घरट्यात मादी एकावेळी 3 ते 8 अंडी घालते. हिवाळ्यात हे पक्षी भारतीय उपखंडात स्थलांतर करण्यास सुरूवात करतात आणि हंगामाच्या शेवटपर्यंत येथेच राहतात. सर्वाधिक उंचीवरून हे पक्षी स्थलांतर करतात. हिमालय ओलांडून ते भारतात येतात.
१७ तासांत दीड हजार कि. मी. अंतराचा पल्ला गाठतात -समुद्र पातळीवर जेथे 10 टक्क्यापेक्षा कमी ऑक्सिजन आढळतो तेथे देखील ते सहजपणे उडतात. तसेच जवळपास 17 तास न थांबता 1500 कि. मी. चा पल्ला सहज पार करण्याची क्षमता त्यांच्यात आढळते. अभ्यासाअंती हे सिध्द झाले असल्याने बार-हेडेड गुज हा पक्षी अनेक दशकांपासून जीवशास्त्रज्ञांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. 1953 मध्ये एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गेचा पाठीराखा राहिलेला न्यूझीलंडचा गिर्यारोहक जॉर्ज लोव यांच्या नोंदीनुसार त्याने माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर उडताना या पक्ष्यांना पाहिले आहे.
सूर्याचीवाडी तलावावर 22 बार हेडेड गुजचे आगमन -जवळपास 22 बार हेडेड गुज पक्षी मायणी पक्षी संवर्धन क्षेत्रापासून पुढे 6 कि. मी. अंतरावरील सूर्याचीवाडीच्या पूर्वेला असलेल्या एका उथळ तलावावर विसावले आहेत. बार हेडेड गुजबरोबरच नॉर्थन पिनटेल बदक, कॉमन कुट, रेड हेड पोचार्ड, लिटील ग्रीब, ग्रे हेरॉन, ओस्प्रे, हेरीयर, रंगीत करकोचा, पांढरा व काळा आयबीस, काळ्या पंखाचा शेकट्या, ग्रीन शन्क या पक्ष्यांचेही आगमन झाले आहे. कराड येथील मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक रोहन भाटे आणि वन्यजीवप्रेमी हेमंत केंजळे यांनी मायणी, सुर्याचीवाडी, येरळवाडी, धोंडेवाडी येथील तलावांवर जाऊन पक्षी निरीक्षण केले.
बार हेडेड गुजसह अनेक पक्षी मायणी, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलावांवर विसावले आहेत. जलसंधारणाची कामे झाल्यामुळे मायणी व येरळवाडी तलावांची खोली वाढली आहे. तलावांमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे पान पक्षी अजून या तलावांवर दाखल झालेले नाहीत.