सातारा - वाळू वाहतुकीच्या पकडलेल्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी तसेच भविष्यात त्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह दोघांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. तलाठी अमोल देशमुख (तलाठी शहापुर सजा वर्ग-3) आणि अविनाश माने (रा. कृष्णकुंज अपार्टमेंट स्वराज नगर, गोडोली) अशी संशयतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, तलाठी अमोल देशमुख याने तक्रारदाराकडे पकडलेल्या वाळूच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी तसेच भविष्यात त्यांच्या वाळूच्या गाडीवर कारवाई करु नये यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. 9 जानेवारी रोजी ही लाच मागण्यात आली होती. दरम्यान, रक्कम अविनाश माने याच्याकडे देण्यास वाळूगाडीवाल्याला सांगण्यात आले होते. याबाबत गाडी मालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर दुसऱ्यादिवशी तक्रारकर्ता गाडीमालक लाचेची रक्कम घेऊनही गेला होता. मात्र, माने याला संशय आल्याने त्याने लाच घेण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, तलाठ्याने लाचेची मागणी मध्यस्ती मार्फत केल्याची खात्री पटल्यावर आणि त्याची पडताळणी झाल्यानंतर सोमवारी लाचलुचपत प्रबंधक विभागाने शाहूपुरी पोलिसांत लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलीस निरीक्षक अविनाश जगताप अधिक तपास करत आहेत.