कराड (सातारा) - कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कराडच्या कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने 21 मे रोजी व्हर्च्युअल पद्धतीने वार्षिक दीक्षांत सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यात 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाची बैठक व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संबंधित अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा झाल्यानंतर 180 दिवसांच्या आत दीक्षांत सोहळा आयोजित करून विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणे आवश्यक असते. कोरानाच्या पार्श्वभूमीवर जाहीर पद्धतीने दीक्षांत सोहळा आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे व्हर्च्युअल पद्धतीने दीक्षांत सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल पद्धतीने पदवी प्रदान करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर विस्तारित दीक्षांत सोहळा आयोजित करून सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आमंत्रित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.