सातारा - सोनगाव बंगला (ता.फलटण) येथे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अंगावर रॉकेल ओतून एकाला पेटवण्यात आले होते. ही घटना १६ जानेवारी २०१५ रोजी घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने अंकुश दाजी चव्हाण (वय ६० रा. सोनगाव बंगला ता.फलटण) यास दोषी धरून त्यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा - जिहे-कटापूर योजनेसाठी केंद्रातून निधी देण्याचे केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांचे आश्वासन
अंगावर रॉकेल ओतून पेटवले
१६ जानेवारी २०१५ रोजी सायंकाळी एका केशकर्तनालय समोरील बाकड्यावर बाबासाहेब केशव भोसले ही व्यक्ती बसलेली होती. त्यावेळी आरोपी अंकुश दाजी चव्हाण तेथे गेला व त्याने पाठीमागून येवून भोसले यांच्या अंगावर कॅनमधील रॉकेल ओतले व पेटवून दिले. त्यामध्ये बाबासाहेब भोसले गंभीर भाजून जखमी झाले होते. त्यांना औषधोपचाराकरीता रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्यांनी मृत्यूपूर्व जबाब दिल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
न्यायालयाने ठरवले दोषी
तत्कालीन पोलीस उपाधीक्षक रमेश चोपडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या खटल्याची सुनावणी ४ थे अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश एस.जी. नंदीमठ यांच्या न्यायालायामध्ये झाली. न्यायालयाने अंकुश दाजी चव्हाण यास गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. या खटल्याच्या सुनावणीत सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड. लक्ष्मण खाडे यांनी काम पाहिले.
हेही वाचा - सरंजामशाही मोडण्यासाठी शेतकरी दहिवडीत ठिय्या आंदोलन करणार ; डॉ. भारत पाटणकर