कराड (सातारा) - एमपीएससीमार्फत 21 मार्च रोजी होणार्या परीक्षेसाठी लॉकडाऊन असणार्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विशेष प्रवासाची परवानगी देण्याची मागणी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आणि उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विशेष प्रवासाची परवानगी द्या -
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सत्यजित तांबे आणि शिवराज मोरे यांनी लॉकडाऊन असणार्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी विशेष प्रवासाची परवानगी देण्याचीही मागणी केली आहे. तसेच युवक काँग्रेसच्यावतीने काही सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचा पुढील त्रास कमी होणार आहे. सरकारने सर्व प्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी, अशी मागणीही केली आहे.
युवक कॉंग्रेसने केले होते आंदोलन -
एमपीएससीमार्फत 14 मार्च रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली. त्याविरोधात विद्यार्थ्यांसह युवक काँग्रेससुद्धा रस्त्यावर उतरली. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली युवक काँग्रेसने मुंबईतील एमपीएससी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शिवराज मोरेंसह कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. विद्यार्थ्यांचा रोष पाहून मुख्यमंत्र्यांनी पुढील तारीख जाहीर करणार असल्याची माहिती माध्यमांसमोर दिली. त्यानुसार आता 21 मार्च रोजी एमपीएससी परीक्षा होणार आहे. नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणार्या बाकीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा - जॉर्ज फ्लॉईडच्या कुटुंबाला मिनियापोलिस प्रशासन देणार 196 कोटी