सातारा - शेतकर्यांची पिळवणूक थांबावी, म्हणून माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. अथणी-रयत युनिटच्या माध्यमातून शेतकर्यांची पिळवणूक थांबविण्यात आपणास यश आले असून ऊस उत्पादक शेतकर्यांचे हित प्राधान्याने जोपासले जात आहे. सभासदांनी न्याय-हक्कासाठी नक्की भांडले पाहिजे. परंतु, सहकार मोडू नये असे प्रतिपादन रयत कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले. शेवाळेवाडी येथील अथनी-रयत साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ वेळी ते बोलत होते.
हेही वाचा - राज्यभरात पुराचा कहर... पीकं जमीनदोस्त; तर शेतांना तळ्याचे स्वरुप!
कराड तालुक्यातील शेवाळेवाडी येथील अथनी-रयत साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला आजपासून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अथनी शुगर्सचे संचालक योगेश पाटील, उपसंचालक आप्पासाहेब गरूड, रयत कारखाना युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील उपस्थिती होते.
यावेळी बोलताना अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, सहकार टिकला आणि वाढला पाहिजे. शेतकरी सभासदांनी न्याय-हक्कासाठी नक्की भांडावे, पण सहकार मोडता कामा नये, याची काळजी घ्यावी. रयत कारखान्याची उभारणी करताना डोंगरी विभागात औद्योगिक क्रांती करण्यासह प्रस्थापित कारखानदारांकडून होणारी शेतकर्यांची पिळवणूक थांबविण्यातही यश आले. कारखानदारीचे फायदे घेताना कारखानदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे तरच ती भविष्यात टिकेल. असे ते म्हणाले. मागील काही वर्षांत नैसर्गिक व मानवी कारणामुळे रयत सहकारी साखर कारखाना अडचणीत सापडला होता. कारखान्याची विक्री होते की काय, अशी अवस्था असताना संस्थापक विलासकाका उंडाळकर यांच्या प्रयत्नामुळे अथणी शुगर्ससोबत करार करून शेतकर्यांचे हित जोपासण्यात यश आले. 82 कोटीपैकी तब्बल 60 कोटी रूपयांची देणी भागविता आली. त्यामुळे रयत कारखान्याची वाटचाल आता उर्जितावस्थेकडे सुरू झाली असल्याचेही अॅड. पाटील यांनी सांगितले.
तर, अथनी शुगर्सचे संचालक योगेश पाटील यांनी शेतकर्यांना यंदाच्या हंगामातही स्पर्धात्मक दर देणार असल्याचे सांगितले. गतवर्षी 2765 रूपये एफआरपी असताना अथणी-रयत कारखान्याने उसाला एकरकमी 2800 रूपये दर दिला होता. तर यंदाच्या हंगामात गळीत होणार्या उसाचे पैसे प्रत्येक पंधरवड्याला शेतकर्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणाही पाटील यांनी केली.