सातारा - कराडमधील धोकादायक गुंड आमिर फारुख शेख (वय २९) याला महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात या कायद्याखालील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत करणे व सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. त्याची रवानगी सातारा जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबतची माहिती दिली.
धोकादायक गुन्हेगार आमिर फारुख शेख याच्यावर 'एमपीडीए' कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव कराड शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी तयार केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी पडताळणी करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. तो धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आमिर शेख याला महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक (एमपीडीए) कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश निघाला. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्ह्यातील दुसरी मोठी कारवाई -
सातारा शहर पोलीस ठाण्यांतर्गत दत्ता जाधव याच्यावर २००७ मध्ये या कायद्याखाली कारवाई झाली आहे. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी झोपडपट्टीदादा कायद्याखाली प्रथमच ही कारवाई झाली आहे.