सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. तासवडे (ता. कराड) येथे पुणे-बंगळुरु महामार्गाच्या रूंदीकरणात तुटणार्या झाडाची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करून घेऊन त्यांचे पुनर्रोपण ते करत आहेत. यादरम्यान, झाडाच्या एका फांदीवरील मधमाशांचे मोहोळ उठले. मधमाशांनी सयाजी शिंदेंसह इतरांवर हल्ला केला. सुदैवाने सयाजी शिंदेंना मोठी दुखापत झालेली नाही. किरकोळ उपचारासाठी ते कराडमधील सह्याद्री रूग्णालयात दाखल झाले आहेत.
महामार्ग रूंदीकरणात हजारो झाडांची कत्तल : सध्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या शेंद्रे-कागल दरम्यानचे सहापदरीकरण सुरू आहे. त्यासाठी महामार्गाकडेची हजारो झाडे तोडण्यात येत आहेत. ती झाडे वाचवून त्यांचे पुनर्रोपण करण्यासाठी सह्याद्रि देवराईचे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे हे सरसावले आहेत. रूंदीकरणात तुटणार्या झाडांची शास्त्रोक्त काटछाट करून त्यांचे इतरत्र पुनर्रोपण ते करत आहेत.
झाडे नेताना मधमाशांचा हल्ला : शास्त्रोक्त पध्दतीने झाडांची काटछाट करून ती झाडे पुनर्रोपणासाठी नेली जात असताना मधमाशांचे मोहोळ उठले. अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या सहकार्यावर मधमाशांनी हल्ला केला. मात्र, कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. तासवडे टोलनाका परिसरातील वहागावच्या हद्दीत ही घटना घडली. मधमाशांच्या हल्ल्यातून बचावलेले सयाजी शिंदे किरकोळ उपचारासाठी कराडमधील सह्याद्रि हॉस्पीटलमध्ये दाखल झाले आहेत.
झाडे वाचविण्याची धडपड : सह्याद्रि देवराईच्या माध्यमातून अभिनेते सयाजी शिंदे हे वृक्ष लागवड आणि वृक्ष पुनर्रोपणासाठी गेली अनेक दिवस राज्यभर काम करत आहेत. डोंगर तसेच माळरानावर त्यांनी वृक्षारोपणातून हिरवळ फुटवली आहे. महामार्गाच्या रूंदीकरणात अनेक जुने वृक्ष तोडले जात आहेत. त्या वृक्षांचे पुनर्रोपण करून त्यांचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न सयाजी शिंदे करत आहेत. गेली दोन दिवस ते तासवडे (ता. कराड) परिरात तळ ठोकून आहेत. तोडल्या जाणार्या झाडांची काटछाट करून त्यांचे इतरत्र पुनर्रोपण करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. याचवेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.
हेही वाचा - Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाचा आमदार हसन मुश्रीफ, अनिल परब यांना दिलासा