कराड (सातारा) - थकित एफआरपीप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असलेल्या सह्याद्री कारखान्यावर आंदोलन करणार होती. परंतु, पोलिसांनी राजू शेट्टी यांना कराड-सांगली हद्दीवर ताब्यात घेत कराडच्या विश्रागृहात आणले. तसेच कारखान्याकडे जाणार्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांना अडविले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या आवारात सरकारविरोधात बोंबाबोंब आंदोलन केले.
सह्याद्री कारखान्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस राजू शेट्टींसह स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून होते. शेट्टी हे सांगलीहून कराडकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे-बंगळुरू महामार्गावर मालखेड फाटा येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेट्टी यांची गाडी महामार्गावर अडविण्यात आली. तसेच बंदोबस्तात त्यांना कराडच्या शासकीय विश्रामगृहावर आणण्यात आले. सहकार मंत्री चर्चा करणार असल्याचे शेट्टींना पोलिसांनी सांगितले. मात्र, शेट्टी यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कार्यकर्ते आक्रमक झाले.
सनदशीर मार्गाने आंदोलनही करायचे नाही का? असा सवाल करत राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर ठिय्या आंदोलन सुरू केले. सहकार मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याशिवाय कराड सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांनी शेट्टींसमवेत चर्चा केली. त्यानंतर ते सह्याद्रि कारखान्याच्या वार्षिक सभेला जाण्यासाठी विश्रामगृहातून बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर सरकारविरोधात घोषणाबाजी आणि बोंबाबोंब केली. यावेळी पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.