सातारा : सातारा बाजार समितीच्या मतदानावेळी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले गटाचे कार्यकर्ते आमनेसामने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून बाहेर काढल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून सोमवारी सकाळी निकाल जाहीर होणार आहे.
कराडमध्ये सर्वाधिक मतदान : जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकीत सरासरी ९३ टक्के आणि कराड बाजार समितीसाठी सर्वाधिक ९७ टक्के मतदान झाले आहे. सातारा ( ९४%), कराड (९७%), पाटण (९३%), कोरेगाव (९५%), वडूज (९०%), फलटण (९२%), लोणंद (९५%) आणि वाई (९१%) मतदान झाले आहे.
'या' कारणावरून वादावादी : बाजार समितीमध्ये काम करणारे मोरे आणि घाडगे नावाचे दोन कर्मचारी विरोधी पॅनेलचा प्रचार करत आहेत. उमेदवारांना फुस लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मतदान केंद्रावर तणाव : दोन्ही राजे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना मतदान केंद्रातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर मतदार प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आणि तणाव निवळला.
कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी : जे कर्मचारी प्रचार करत आणि मतदारांवर दबाव टाकत होते, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उदयनराजे भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी सेवक पदाचा राजीनामा देऊन उघडपणे राजकारण करावे. आम्ही त्यांचे लोकशाही पद्धतीने स्वागत करू. परंतु आधी दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा उदयनराजेंच्या गटाने घेतला. जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांसाठी सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून सोमवारी सकाळी निकाल जाहीर होणार आहे.