कराड (सातारा) - अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या खटल्यातील आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरीसह 50 हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर औटी यांनी ठोठावली. तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीस भरपाई म्हणून देण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
दिनेश मोहन पवार (मूळ रा. बिबी, ता. पाटण, सध्या रा. सुपने, ता. कराड), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अॅड. मिलींद कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पीडितेचे कुटुंबीय सुपने (ता. कराड) येथील गुर्हाळघरावर कामास होते. ऊसतोडीसाठी ते पाटण तालुक्यात गेले असताना आरोपीने अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी 26 डिसेंबर 2019 रोजी आरोपीस कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये त्याच्यावर कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याच्या सुनावणीत तक्रारदार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांसह तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डी. डी. पाटील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. पीडित मुलीचा वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल आणि साक्षी-पुरावे ग्राह्य धरून न्या. ए. ए. आर. औटी यांनी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीस भरपाई म्हणून देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.