सातारा (कराड) - ऊसतोड मजुरांना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळील खोडशी गावाच्या हद्दीत बुधवारी रात्री हा अपघात झाला. अपघातात मृतांपैकी टेम्पो चालक हा कर्नाटकमधील आणि दोन ऊसतोड मजूर हे बीड जिल्ह्यातील आहेत. जखमींवर कराडमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल
टेम्पो चालक पुट्टाप्पा जयाप्पा बेनकनशेट्टी (35 रा. आळगवाडी, जि. बेळगाव), नामदेव किसन साखरे (40, रा. तांदूळवाडी, जि. बीड) आणि कृष्णत महादेव काळे (रा. परळी, जि. बीड), अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. शांताराम अच्युतराव चव्हाण (35), राजमती विष्णू काळे (25) आणि ताई विष्णू काळे (4 वर्षे) हे या अपघातात जखमी झाले आहेत.
पुट्टाप्पा जयाप्पा बेनकनशेट्टी हे बुधवारी रात्री टेम्पोतून (केए 22 डी 1878) भाजीपाला घेऊन बेळगावहून मुंबईकडे निघाले होते. तर ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमधून (एम.एच. 44 एस 2831) वाई तालुक्यातील भुईंजकडे निघाले होते. कराडजवळच्या खोडशी गावच्या हद्दीत टेम्पोने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक बेनकनशेट्टी आणि नामदेव किसन साखरे हे दोघे जागीच ठार झाले. तर कृष्णत महादेव काळे हे गंभीर जखमी झाले. पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरमधील खासगी रूग्णालयात नेण्यात आले. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. गुरूवारी सायंकाळी उपचार सुरू असताना कृष्णत काळे यांचा कोल्हापूरमधील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला.
हेही वाचा... पत्नीच्या पाठोपाठ पतीची आत्महत्या; तीन वर्षाचा चिमुरडा ठरला निमित्त