सातारा - तेरा लाखांचे बिल पुढील कार्यालयात मंजुरीला पाठविण्यासाठी 39 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी फलटणच्या वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मदार वग्यानी (वय 41 रा. फलटण. मूळ रा. सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
पोलिसांच्या माहितीनुसार, 39 वर्षीय तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी महावितरण कंपनीमध्ये 13 लाख रुपयांची वीजवाहिन्या अंडरग्राउंड करण्याची कामे केली होती. या कामाचे बिल मंजुरीला पुढील कार्यालयात पाठवण्यासाठी कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी याने त्यांच्याकडे तीन टक्के प्रमाणे 39 हजार रुपये मागितले. या प्रकारानंतर तक्रारदाराने सातारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेऊन रीतसर तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली असता वग्यानी हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. आज (मंगळवारी) दुपारी फलटणमधील महावितरणच्या कार्यालयातच वग्यानीला 39 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहात पकडले.
फलटण शहर पोलिसांत गुन्हा दाखल
फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक उपनिरीक्षक आनंदराव सपकाळ, विजय काटवटे, भरत शिंदे, संजय साळुंखे, पोलीस नाईक विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी या कारवाईत सामील होते.