सातारा - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार' आणि आरोग्य सेवेत क्रांती करणारे माय लॅबचे संस्थापक हसमुख रावल यांना 'आबासाहेब वीर प्रेरणा' पुरस्कार जाहीर करण्यात आला.
कोरोनामुळे समारंभ नाही -
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी सांगितले, की एक लाख रूपये आणि सन्मानपत्र तसेच 51 हजार रूपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारार्थींना त्यांच्या पुणे येथील बाबा आढाव यांना हमाल पंचायत येथे तर रावल यांना निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान -
कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे 25 वे वर्ष आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात समाजहिताचे कार्य अखंडपणे करित युवा पिढीला प्रेरक ठरणाऱ्या तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा, या उद्देशाने 'आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार' देण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष असून 51 हजार रूपये रोख आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा -
कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्याप्रती केलेल्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या भावनेतुन त्यांना हा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करताना किसन वीर व्यवस्थापनास मनस्वी आनंद होत असल्याचे मदन भोसले यांनी सांगितले. हसमुख रावल यांनी सर्वसामांन्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्याच्या ध्यासातून केलेल्या महत्वपूर्ण कार्यासोबत देशातील पहिल्या स्वदेशी कोव्हिड 19 आरटी पीसीआर टेस्ट किटची यशस्वी निर्मिती करुन या बिकट परिस्थितीत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्याचा आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
हेही वाचा - खासदार-आमदारांच्या प्रकरणात सीबीआयसह ईडीकडून दिरंगाई; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
हेही वाचा - ओडिशात वयोवृद्ध व्यक्तीने पत्नीच्या चितेवर उडी घेत जीवनयात्रा संपवली