सातारा - वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळुबाई मंदिराच्या दानपेटीतील रकमेची चोरी आणि अपहाराच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. घटनेच्या सखोल चौकशीच्या मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, चोरी आणि अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या देवस्थानचे सचिव, सहसचिव आणि कर्मचाऱ्यांची पोलीस कोठडी चार दिवसांनी वाढली आहे.
मांढरदेव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - मांढरदेव येथील काळुबाई मंदिराच्या दानपेटीतील रक्कम मोजत असताना झालेल्या चोरीचा निषेध करत या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी मांढरदेव येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्याला सोमवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यामुळे काळुबाई मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
सचिव, सहसचिवासह कर्मचाऱ्यांना अटक - काळुबाई मंदिराच्या दानपेटीतील रकमेची मोजणी करताना निवृत्त बँक कर्मचारी, सहसचिवासह एका कर्मचाऱ्याने १ लाख ६४ हजार रुपयांची रक्कम व सोन्याचे दागिने लांबविले होते. याप्रकरणी त्यांना अटक करून घर झडती घेण्यात आली होती. झडतीमध्ये १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडीत सुनावली होती. त्यांच्या चौकशीत देवस्थानचा सचिव रामदास खामकर याचे नाव समोर आल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्या घर झडतीत मुद्देमालासह देवस्थानच्या बँक पावत्या, बोगस चेक सापडले.
संशयितांच्या चौकशीची मागणी - चोरी आणि अपहार प्रकरणी अटक केलेल्या सर्वांची कसून चौकशी करावी. या कटात सामील असणाऱ्यांना ताब्यात घ्यावे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देवस्थानचे सचिव रामदास खामकर, सहसचिव चोपडे आणि कर्मचारी ढेबे यांची पोलीस कोठडी चार दिवसांनी वाढवून दिल्यामुळे पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे या घटनेचा तपास करत आहेत.