कराड (सातारा) - पेट्रोलिंग करत असताना एका पोलिसाला रस्त्यात आजीबाई भेटल्या. कुठे चाललाय म्हणून विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, घरात आठ दिवसापासून गोडेतेल नाही. त्या पोलिसाने त्यांना दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकात बोलावून गोडेतेलाची पिशवी दिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि खाकीतील माणुसकीचे दर्शनही घडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमी सर्वत्र टाळेबंदी सुरू आहे. या काळा रोजंदारी कामगार, गरिबांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली आहे. अनेकांच्या घरातील किराणा सामान संपत आहे. अशात कराडमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा पन्नाशी पार गेल्याने कराड, मलकापूरसह आसपासची गावे पुर्णपणे बंद आहेत.
संचारबंदीच्या काळात बंदोबस्तावेळी शिवाजी हौसिंग सोसायटी परिसरात पेट्रोलिंग करताना कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारुती चव्हाण यांना रस्त्यावर एक आजी दिसल्या. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन संचारबंदीच्या काळात बाहेर का फिरत आहात, अशी विचारणा केली. त्यानंतर घरातील गोडेतेल आठ दिवसापासून संपलेले आहे आणि पैसेही संपलेले आहे, त्यामुळे घराबाहेर पडल्याचे आजीने सांगितले. पण, दुपारच्यावेळी सर्व दुकाने बंद असल्याने त्यांनी त्या आजी दुसऱ्या दिवशी विजय दिवस चौकातील पोलीस चौकीजवळ यायला सांगितले.
हवालदार चव्हाणांकडेही नव्हते पैसे
सकाळी आजी येतील म्हणून हवालदार चव्हाण लवकर विजय दिवस चौकातील पोलीस चौकीत गेले. यावेळी ते जवळच्या किराणा दुकानदाराकडून तेलाची पिशवी घेतली. त्या पिशवीची किंमत शंभर रुपये होती. पण, हवालदार चव्हाणांच्या खिशातून केवळ साठ रुपयेच निघाले. मग, त्यांना दुकानदाराला उर्वरित पैसे नंतर देतो आता पिशवी द्या, अशी विनंती करुन पिशवी घेतली. त्यानंतर काहीवेळाने त्या आजी आल्यानंतर चव्हाण यांनी आजीला तेलाची पिशवी दिली.
चेहऱ्यारील समाधान लाखमोलाचे
हवालदार चव्हाण यांनी गोडेतेलाची पिशवी आजींना दिली. त्यावेळी त्या आजींच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी पोलीस आहे म्हणून त्या आजीला मला मदत करता आली. गोडेतेलाची पिशवी केवळ शंभर रुपयांची होती. पण, तिच्या चेहऱ्यावरील समाधान लाखमोलाचे होते, अशी प्रतिक्रिया हवालदार मारूती चव्हाण यांनी व्यक्त केली.
आपल्या कर्मचाऱ्याने एका वृद्ध महिलेला केलेल्या मदतीबद्दल वरिष्ठांना समजताच पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी हवालदार चव्हाण यांचे कौतुक केले.
हेही वाचा - कराडमध्येच होणार कोरोना चाचणी, कृष्णा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेला मान्यता